परभणी : मानवी जीवन व संगीत हे नाते अतूट असे असते. प्रत्येक बालकांशी संगीताचे नाते त्याची माता थपकीच्या माध्यमातून जोडत असते. जीवनात पुढे हेच नाते दृढ होवून आपण सुखदु:ख झेलत असतो, असे प्रतिपादन माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी केले. परभणी येथे आयोजित पुर्णवादी ग्रंथ संमेलनातील ऋणनिर्देश या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रासाठी योगदान देणा-या दिग्गज कलावंतांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी अनिल मोरे, मीनाताई बोर्डीकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी गुणेशदादा व संगीता वहिणी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मराठवाड्यात अभिजात संगीताचा प्रचार करणा-या कै.अण्णासाहेब गुंजकर यांचा सन्मान त्यांचे सुपुत्र पं. श्यामराव गुंजकर यांनी बोर्डीकर यांच्या हस्ते स्विकारला. ऋषीतूल्य व्यक्तिमत्व कै.पं.स.भ.देशपांडे मास्तर, कै.नाथराव नेरलकर यांचा सत्कार रमाकांत पैजने यांनी स्विकारला. पं.उत्तमराव अग्निहोत्री यांचा सन्मान त्यांच्या कन्या उषाताई जोशी यांनी स्विकारला. पं. शांताराम चिगरी यांचा पुरस्कार अंगद गायकवाड यांनी स्विकारला. परभणीचे डॉ.गुलामरसूल यांचा पुरस्कार त्यांचे शिष्य देवीदास अधार्पूरकर यांनी स्विकारला. कै. हरिभाऊ चारठाणकर यांचा सन्मान यशवंत चारठाणकर यांनी स्विकारला. श्रीमती सीताभाभी राव यांचा पल्लवी जवळेकर यांनी, तबला वादक पं.सतिशचंद्र चौधरी यांचा पुरस्कार आबा टाकळकर यांनी तर विजयालक्ष्मी बर्जे यांचा सन्मान प्रसादजी बर्जे यांनी स्विकारला. सुरमणी डॉ.दत्ता चौगुले यांचा पुरस्कार जयश्री भोसले यांनी, पं. वसंतराव शिरभाते यांचा पुरस्कार पंकज शिरभाते यांनी स्विकारला. रसिकराज वसंतराव पाटील यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी मालतीबाई पाटील यांनी स्विकारला. गायक पं.शिवदास देगलूरकर यांचाही सत्कार करण्यात आला. दृकश्राव्य माध्यमातून वरील ऋषितूल्य कलावंतांच्या आठवणी जागविल्या. सुत्रसंचालन किशोर पुराणिक यांनी केले.