बँकॉक : वृत्तसंस्था
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भयंकर घटना घडली. याठिकाणी एका पबमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीमध्ये ६३ जण गंभीर जखमी झालेत. या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीत जखमी झालेल्या ६३ जणांपैकी २२ जणांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉक शहराच्या उत्तर भागातील एका पबमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली. क्षणात ही आग वाढत गेली आणि संपूर्ण इमारतीला आगीने वेढा घातला. आग लागताच सर्वजण घाबरून जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पण आग जास्त भीषण असल्यामुळे अनेकांना पबमधून बाहेर पडता आले नाही. क्षणात आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण बिल्डिंगला वेढा घातला. त्यामुळे घटनास्थळी भीतीचे वातावरण होते.
थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी या घटनेनंतर घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत २७ जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाला. अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी आणि बचाव पथकातील कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पबच्या मुख्य प्रवेशद्वारातून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत होत्या तर आत असलेले नागरिक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत होते.
स्थानिकांनी सांगितले की, चाटुचक जिल्ह्यातील ‘राँग बीअर ना लाट फ्राओ’ या पबला ही आग लागली. बचाव पथकाने सुरुवातीला जखमी झालेल्या एका व्यक्तीला बाहेर काढले पण नंतर त्यांच्या लक्षात आले की अनेक जण पबमध्ये अडकले आहेत. एक एक करत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आगीपासून वाचण्यासाठी अनेक जण पबच्या टॉयलेटमध्ये लपले होते. त्यामुळे त्याठिकाणापर्यंत आग पोहचली आणि त्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्याच ठिकाणी अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. एकाच ठिकाणावरून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले.
















