मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भाजपाकडील खात्यांना, मतदारसंघांना सर्वाधिक, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला निधी दिला असून शिंदेच्या शिवसेनेला कमी निधी दिल्याने सत्ताधारी महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. भाजपकडे असलेल्या खात्यांना ८९ हजार १२८ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसकडील खात्यांना ५६ हजार ५६३ कोटी व शिवसेनेकडील खात्यांसाठी ४१ हजार ६०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय तरतूद करताना भाजपा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. यामुळे महायुतीत पुन्हा शीतयुद्ध सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपच्या वरिष्ठ आमदारांनी मात्र हा आरोप फेटाळला. भाजपकडे जास्त खाती आहेत. आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तरतुदी अधिक असणे स्वाभाविक आहे. कोणत्या पक्षाकडे खाते आहे हे बघून निधीवाटप होत नाही, तर त्या त्या विभागांच्या आवश्यकतेनुसार अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्यामुळे त्याला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर अर्थसंकल्प पूर्ण वाचून त्यातील सर्व तरतुदी पाहिल्यानंतरच याबाबत बोलणे योग्य राहील असे सांगत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.