टेंभुर्णी : प्रतिनिधी
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर वेणेगाव (टें) शिवारात केमिकल टँकर व दुुचाकीच्या भीषण अपघातात एक पुरुष व दोन महिलांचा दुुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ४ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेणेगावच्या शिवारात पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारा केमिकल टँकर(क्र. टीएस ३० टी ३३६६) हा महामार्गावरून जात होता. सदर टँकर बरकतअली मौलाअली शेख (२५, रा. जळकोट, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा चालवत होता. याचवेळी पंढरपूरकडून नंदुरबारकडे दुचाकीवरून प्रवास करणारे मीरा राज्य भील(३८), पायल मीरा भील(१५) व खारकी मीरा भील (वय २६, सर्व रा. कोटबंधनी, पो. रायपूर, ता. शहादे, जि. नंदुरबार) हे वेणेगाव ब्रिजखालून साईड पट्टीने वेणेगाव फाट्याकडे येत होते.
वेणेगाव फाट्याजवळ पुणे-सोलापूर महामार्ग क्रॉस करून पुण्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असताना केमिकल टँकर व होंडा शाईन दुुचाकी (क्र. एमएच ३९ ई ६७७८) यांची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुुचाकीवरील तिघेही जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने खासगी अॅम्ब्युलन्सद्वारे टेंभुर्णी येथील मार्स मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

