13.6 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमनुस्मृतीवरून आताच्या ब्राम्हणांवर टीका करणे चुकीचे

मनुस्मृतीवरून आताच्या ब्राम्हणांवर टीका करणे चुकीचे

छत्रपती संभाजीनगर : मनुस्मृती फाडली जाते, जाळली जाते. असे केल्याने काय फरक पडणार आहे? मनृस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? मनुस्मृती ज्यावेळी लिहिण्यात आली, तेव्हा एकट्या ब्राह्मणानेच लिहिली नाही. जे जे मनू होऊन गेले, ते सर्व ब्राह्मणच होते, यावर विश्वास असण्याचे कारण नाही. त्यातील जे चांगले आहे ते घ्या, जे वाईट आहे त्यावर सर्व मिळून टीका करू, अशी रोखठोक भूमिका खा. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरात आयोजित ब्राह्मण अधिवेशनात मांडली. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ऊठसूट विनाकारण ब्राह्मणांवर टीका करणे आता थांबवा, असा इशाराही त्यांनी दिला.

अ. भा. पेशवा संघटनेच्या तापडिया नाट्यमंदिरात आयोजित या अधिवेशनाला राज्यभरातून ब्रह्मवृंद दाखल झाला होता. खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. समाजाची आजची परिस्थिती व राजकीय स्वार्थापायी राजकारणाकडून सतत समाजावर होणारी टीका, यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

समाज दोषी कसा?
महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष? मात्र, संपूर्ण ब्राह्मणांवर त्याचा राग काढण्यात आला, समाजाला वाळीत टाकण्यात आले. अजूनही विरोधी राजकारणी समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी त्या घटनेवरून ब्राह्मण समाजावर टीका करतात. हे किती दिवस सहन करायचे? हे थांबले पाहिजे, असेही खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

शेंडी, जाणव्यावर टिंगल करणा-यांची वृत्ती
आम्ही शेंडी, जाणव्याचे हिंदुत्व मानत नाही, असे लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, शेंडी, जाणव्याचे असे कोणते वेगळे हिंदुत्व नाही आहे. हिंदू धर्मात असे अनेक समाज, पंथ आहेत ज्यात संस्कार, विधी म्हणून शेंडी ठेवली जाते व जाणवे घातले जाते. एकटा ब्राह्मण समाजच नाही. समाजा-समाजात द्वेष निर्माण करणा-या अशा राजकारणी मनोवृत्तीला कायमचे मिटवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR