23.7 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeपरभणीसामाजिक कार्यकर्त्या सुशीला साबळे यांना जामकर दर्पण पुरस्कार जाहीर

सामाजिक कार्यकर्त्या सुशीला साबळे यांना जामकर दर्पण पुरस्कार जाहीर

परभणी : कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सुशीला विठ्ठल साबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. २० जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

माजी मंत्री रावसाहेब जामकर यांनी सुविद्य पत्नी कै.सौ. कमलताई जामकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलेच्या सन्मानार्थ सन १९९७ पासून कै.सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्काराचा उपक्रम सुरू केला. २०२३-२४ या वर्षी हा पुरस्कार सौ. सुशिला साबळे (उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कचरा वेचक संघटना आशिया विभाग, परिसर भगिनी विकास संघ, मुंबई) यांना डॉ. मनोहर चासकर (कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) यांचे हस्ते दि. २० जून रोजी सकाळी ११ वाजता कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहात प्रदान केला जाणार आहे. या प्रसंगी खा. संजयराव जाधव यांनी विजयाची हॅट्रीक केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हेमंतराव जामकर (अध्यक्ष नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी) यांची उपस्थिती असणार आहे. पुरस्काराच्या मानकरी सुशिला साबळे, सत्कार मुर्ती खा. संजयराव जाधव, प्रमुख अतिथी डॉ.मनोहर चासकर (कुलगुरू स्वा.रा‌.ती.म.विद्यापीठ नांदेड), आ. डॉ‌. राहुल पाटील, अ‍ॅड. किरणराव सुभेदार (उपाध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी, कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार निवड समितीचे उपाध्यक्ष), अ‍ॅड.बाळासाहेब जामकर, सचिव विजयराव जामकर, सहसचिव अनिल मोरे, प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जागतिक पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविणा-या सुशिला ताईनी शिरनेर ता. अंबड जि.जालना येथील रेश्मा किसनराव कांबळे यांच्या पोटी जन्म घेतला. वयाच्या १० व्या वर्षी १९७२च्या दुष्काळात आई आणि भावंडा सोबत कामासाठी मुंबई गाठली. मुबंई येथे आई बरोबर सुशीला ताईने कचरा वेचण्याच्या कामाला सुरुवात केली. सभाधिटपणा आणि संघटन कौशल्य यामुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर कचरा वेचक संघटनेचे नेतृत्व करत कचरा वेचक ते पर्यावरण रक्षक त्या बनल्या. व्यसनमुक्ती, शिक्षण, समुपदेशन, आरोग्य इ.केंद्र, कचरा वेचक परिवारास मदत कार्या सोबतच बचतगट, मुंबईत सात ठिकाणी कचरा संकलन व वर्गीकरण डेपो इत्यादी कार्यामुळे जागतिक कीर्ती लाभली. अशा कर्मयोगीनी मराठवाडी मराठी कन्येचा हा एक सन्मान सोहळा.

कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास निमंत्रितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कै.सौ‌.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब जामकर, सचिव विजयराव जामकर, सहसचिव अनिल मोरे, प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR