मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना दोनदा आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी जरांगे यांनी मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघण्याचा निर्धार व्यक्त केला. ते १९ सप्टेंबर रोजी मुंबईत पोहोचतील आणि आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत.
काहीही झाले तरी आपण सरकारला शरण येणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास परवानगी नाकारली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे म्हटले. संविधानाच्या चौकटीबाहेरील मागण्या शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी आपण लवकरच त्यांची भेट घेणार असून त्यांचे गैरसमज दूर करणार असल्याचे म्हटले.
मनोज जरांगे पाटील ज्या काही गोष्टी बोलतात, त्या पूर्ण सत्य नसून अर्धसत्य आहेत आणि त्यामागे काही गैरसमजही आहेत, असे देसाई यांनी म्हटले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारच्या सर्व प्रक्रियेत सध्या प्रामाणिकपणे सुरू आहेत. सातारा गॅझेट आणि ५८ लाख कुणबी नोंदी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर सरकार नियमानुसार आणि गांभीर्याने कायदेशीर पावले उचलत आहे, अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली. तसेच लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन मनोज जरांगे यांच्या मनातील सर्व गैरसमज दूर केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दुस-यांदा परवानगी नाकारली असली तरी आपण एकट्याने उपोषणाला जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला जाणार नसून एकट्याने उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई पोलिसांनी दुस-यांदाही कायदेशीर आणि सुरक्षेची कारणे देत उपोषण नाकारल्यामुळे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहून मुंबई गाठणार की उच्च न्यायालयात दाद मागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एकट्याने आंदोलनासाठी मागितली परवानगी
राज्य सरकारने गणेशोत्सवाचे कारण देत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांना परवानगी नाकारली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना आंदोलनाचा फेरविचार करण्याची विनंती केली. जरांगे यांनी मात्र, आझाद मैदानावर एकट्याने आंदोलनाची परवानगी मिळावी, यासाठी पुन्हा अर्ज केल्याची माहिती गंगाधर काळकुटे यांनी दिली.
सरकारने योग्य मार्ग काढला पाहिजे : सुळे
जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, ओबीसी आंदोलन करत आहेत, एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर आहेत, आदिवासी मुले रस्त्यावर आहेत, प्रत्येक जिल्ह्यात कुठले ना कुठले आंदोलन या राज्यात सुरू आहे. सरकारने प्रत्येकाशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, असेही सुळे यांनी म्हटले.
















