31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeक्रीडाजॅक्सचे ४१ चेंडूत शतक; आरसीबीचा ४ ओव्हर राखून विजय

जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; आरसीबीचा ४ ओव्हर राखून विजय

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीकडून किंग कोहली आणि विल जॅक्सने शानदार खेळी केली. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने अवघ्या १६ षटकांत विजय साकारला. विल जॅक्सने नाबाद शतक झळकावले तर विराट कोहलीने ७० धावांची नाबाद खेळी केली. विराट आणि जॅक्सच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने २४ चेंडू राखून विजय मिळवला. आरसीबी आणि गुजरात यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना पार पडला.

तत्पुर्वी, यजमानांनी सावध खेळी करत डाव सावरला. शाहरूख खान आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतकी खेळी करून आरसीबीला चोख प्रत्युत्तर दिले. गुजरातकडून वृद्धिमान साहा (५), शुबमन गिल (१६) आणि शाहरूख खानने (५८) धावा केल्या, तर साई सुदर्शन (नाबाद ८४ धावा) आणि डेव्हिड मिलरने नाबाद २६ धावा केल्या. अखेर गुजरातने निर्धारित २० षटकांत ३ बाद २०० धावा केल्या होत्या. सुदर्शनने ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ८४ धावांची अप्रतिम खेळी केली.

गुजरातने दिलेल्या २०१ धावांच्या आव्हानाकडे कूच करताना आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी चांगली सुरुवात केली. पण, साई किशोरने प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. डुप्लेसिस १२ चेंडूत २४ धावा करून तंबूत परतला. मग विराट कोहली आणि विल जॅक्स यांनी डाव सावरला आणि सामन्याचा शेवट केला. आरसीबीने १६ षटकांत १ बाद २०६ धावा करून मोठा विजय मिळवला. विराटने ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४४ चेंडूत ७० धावा केल्या, तर विल जॅक्सने १० षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४१ चेंडूत शतक झळकावले. गुजरातकडून १६ वे षटक राशिद खान टाकत होता. या षटकात षटकारांचा पाऊस पाडत जॅक्सने शतकासह आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR