बीड : जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या हत्येला २२ उलटूनही मुख्य आरोपींना अटक करण्यात अपयश येत असल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. त्यातच काही वेळापूर्वीच एक मोठी अपडेट घडली. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असून तो मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. पण आता सीआयडी आणि बीड पोलिसांनी फास आवळल्यानंतर कराड हा पुण्यात सीआयडी समोर शरण आला आहे. त्याची आता सीआयडीमार्फत कसून चौकशी केली जाणार असून पुढील काही तासांतच त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख यांंची हत्या झाल्यानंतर बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा अंजली दमानिया जोरदारपणे उचलून धरला होता. तसेच त्यांनी बीडमधील गुन्हेगारांचे व्हीडीओ, व्हाटस् अॅप, फोटो शेअर करत खळबळ उडवून देत पोलिस यंत्रणांवर ताशेरे ओढले होते. आता त्यांनी वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे.
अंजली दमानिया यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड यांच्या शरणागतीवरुन मोठा सवाल उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश पाहता पोलिस यंत्रणा व गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का? असा प्रश्न पडत आहे. तसेच आज त्यांना शेवटी अटक झाली आहे. यातून पुढे सगळी चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दमानिया म्हणाल्या, वाल्मिक कराडच्या अटकेसाठी २० दिवस लागले हे शॉकिंग आहे. ते पुण्यात शरण आलेत. १७ तारखेला त्यांच्या मोबाईलवरून केलेला शेवटचा कॉल पुण्यातला होता. आज ३१ तारखेलाही ते पुण्यातच शरण आले असतील तर याचा अर्थ ते इतके दिवस पुण्यातच होते. आता आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का? हा प्रश्न पडतोय असा संंशय त्यांनी व्यक्त केला आहे.
याचवेळी दमानिया यांनी हे सगळे राजकारणी एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते असे म्हणत काही नेत्यांची नावेही घेतली. त्यात शरद पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत. जर गुन्हेगार लोकांचे राजकारण्यांशी संबंध असतील तर आपल्याला न्याय कधी मिळेल हा प्रश्न पडत असल्याचेही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.