देहराडून : हिंदूंमध्ये चारधाम यात्रेला अनण्यसाधारण महत्व आहे. यंदाच्या वर्षी अक्षय तृतीयेला यात्रेला सुरूवात झाली होती. त्यामुळे भाविकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. मात्र येथील बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे याचा यात्रेवर परिणाम होत असतो. हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळाची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन केदारनाथ धामाकडे जाणा-या भाविकांना विविध टप्प्यांवर आणि होल्डिंग क्षेत्रांमध्ये थांबवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान विभागाने जारी केलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील विविध डोंगराळ भागांत सतत पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत अतिवृष्टी, वेगवान वारे आणि वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे केदारनाथ धामाकडे जाणा-या भाविकांना विविध ठिकाणी थांबवून सुरक्षित निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पायी जाणा-यांना सुरक्षित स्थळी हलवले
पायी प्रवास करणा-या यात्रेकरूंना देखील जवळच्या सुरक्षित ठिकाणी आणि निश्चित करण्यात आलेल्या होल्डिंग क्षेत्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच श्रीनगर परिसरातून केदारनाथकडे जाणा-या वाहनांची वाहतूकही सध्या थांबवण्यात आली आहे. हवामान सुधारत नाही तोपर्यंत सर्व वाहने निश्चित ठिकाणी उभी करण्यात येत आहेत, जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता येईल.
पुढे जाण्याची परवानगी कधी मिळणार?
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हवामानात सुधारणा झाल्यानंतर आणि संपूर्ण यात्रा मार्ग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच भाविकांना आणि वाहनांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
















