एटापल्ली (गडचिरोली) : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे रूपांतर आधी प्रेमात आणि नंतर थेट रक्तरंजित थरारात झाल्याची धक्कादायक घटना रविवार, ३१ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एटापल्ली-जारावंडी मार्गावर समोर आली. इन्स्टाग्रामवर सुरूवातीला समलैंगिक प्रेम झाले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने, एका मित्राने दुस-या मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याचा गळा चिरून निर्घृण खून केला. हा थरार एटापल्लीपासून २० किमी अंतरावर असलेल्या हालेवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावाजवळ घडला.
सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (वय ३२, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असे मृत तरुणाचे नाव असून, आरोपी सूरज हलदार (वय ३०, रा. मिरगन, ता. रायघर, जि. नबरंगपूर, ओडिशा) याला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
इन्स्टाग्रामवर वाढली समलैंगिक जवळीक
मृत सतीशकुमार याचा नागेपल्ली येथे गॅरेजचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची आणि ओडिशातील सूरज हलदारची ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत आणि पुढे समलैंगिक जवळीकतेमध्ये झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर सूरज याने सतीशकुमारकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, सतीशकुमार हा आधीच विवाहित असल्याने तो सूरजसोबत लग्न करण्यास राजी नव्हता.
ओडिशाला सोडायला निघाला होता
एकतर्फी प्रेमात बुडालेला सूरज हा दोन दिवसांपूर्वी सतीशकुमारला भेटण्यासाठी ओडिशातून नागेपल्ली येथे आला होता. येथे आल्यानंतर त्याला सतीशकुमार हा विवाहित असल्याचे कळले. दोन दिवस एकत्र घालवल्यानंतर, रविवारी पहाटे सूरज आपल्या गावी ओडिशाला जाण्यासाठी निघाला. सतीशकुमार त्याला सोडण्यासाठी आपल्या ‘एमएच ३४ बीएफ २५६०’ क्रमांकाच्या चारचाकी कारने छत्तीसगडच्या सीमाभागातून ओडिशाच्या दिशेने घेऊन जाणार होता. मात्र, प्रवासादरम्यान देवदा गावाजवळ पोहोचताच सतीशकुमार विवाहित असल्याच्या मुद्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भावना दुुखावलेल्या सूरजने आधीच केलेल्या प्लॅनिंगनुसार आपल्यासोबत आणलेला चाकू काढला आणि सतीशकुमारवर सपासप वार करून त्याचा खून केला.
नागरिकांची तत्परता; आरोपीला पकडले
देवदा गावाजवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा रक्तरंजित प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी प्रसंगावधान राखत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी सूरज हलदारला जागीच पकडले आणि घटनेची माहिती पोलिसांना देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या त्याच्यावर एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती हालेवारा पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक दाबेराव यांनी दिली.
















