23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसंपादकीयलढवय्याची हत्या!

लढवय्याची हत्या!

रशियाचे हुकूमशहा ब्लादिमिर पुतिन यांच्या पुतिनशाहीला आव्हान देऊन त्यांना घाम फोडणा-या लढवय्या अ‍ॅलेक्सी नव्हाल्नी यांना तुरुंगात डांबल्यावर त्यांचे पुढे काय होणार याची स्पष्ट कल्पना जगाबरोबरच नव्हाल्नी यांना स्वत:लाही होतीच. तरीही त्यांनी तुरुंगातूनही आपल्या बाहेर असणा-या समर्थकांकरवी पुतिन यांच्या राजवटीचा, सरकारी भ्रष्टाचाराचा भांडाफोड सुरूच ठेवला होता. अखेर डोक्यावरून पाणी जातेय हे लक्षात आल्यावर नव्हाल्नी यांनाही पूर्वाश्रमीच्या पुतिनविरोधकांच्या वाटेने पाठवून रस्त्यातील अडसर दूर करण्याचा सोपस्कार पुतिनशाहीने पार पाडला! अलेक्झांडर लित्विनेन्की, बोरिस नेम्त्साव, बोरिस बेरेझोवस्की, बदारी पतारलत्सिविली, निकोलाय ग्लुश्कॉव, युरी गोलुवेब, सर्जेई युशेन्कोव, नत्याला एस्तिमिरोवा, सर्जेई मॅग्नेस्की, अ‍ॅना पोलित्कोवस्काया, १५७ पत्रकार, येव्गेनी प्रिगोझिन, ब्लादिमिर कारा-मुर्झा, मिखाईल खोदोर्कोवस्की, बुद्धिबळ जगज्जेता गॅरी कास्पारॉव अशा अत्यंत लांबलचक असणा-या पुतिनशाहीच्या बळींच्या यादीत आता अ‍ॅलेस्की नव्हाल्नी यांचाही समावेश झाला आहे.

तुरुंगात कोठडीबाहेर फेरफटका मारत असताना ते कोसळले व त्यांचा मृत्यू झाला असे प्रशासनाने जाहीर केले. नव्हाल्नी यांच्या अधिकृत प्रवक्त्यानेही त्यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली. दिसताना हा गूढ मृत्यू दिसत असला तरी तो कुणी घडवून आणला हे रशियातील शेंबड्या पोरालाही चांगलेच ठावूक आहे. त्यामुळे नव्हाल्नी यांना सार्वत्रिकपणे श्रद्धांजली वाहू नये यासाठी पुतिन राजवटीने देशात मोठा दबाव निर्माण केलेला असतानाही तो झुगारून देऊन हजारोंच्या संख्येने लोक घराबाहेर पडले व त्यांनी या लढवय्यास श्रद्धांजली वाहिली. नव्हाल्नी यांनी हौतात्म्य पत्करले व त्याने आता रशियात ठिणगी पडली आहे.

अर्थातच ती विझवून टाकण्यासाठी पुतिन राजवटीने दडपशाहीचा बडगा उगारला आहे. नव्हाल्नी यांच्या चारशेहून अधिक समर्थकांना अटक करण्यात आली आहे. नव्हाल्नी यांच्या हत्येचा विषय केवळ रशियाच्या अंतर्गत राजकारणाचा विषय न राहता तो आता जगभर सुरू असलेल्या एकाधिकारशाहीच्या विरोधातील लढ्याचा विषय झाला आहे. त्यामुळे पुतिनशाही जगाच्या टीकेचा व निषेधाचा विषय बनली आहे. अर्थात याचा पुतिन यांच्यावर काही परिणाम होण्याची शक्यता नाहीच कारण पुतिनसारखा हुकूमशहा पुरता निर्ढावल्यानंतर असे बेबंद वागत असतो. त्यामुळे नव्हाल्नी यांच्या हत्येचा अमेरिका, युरोपीय देशांसह जगाने निषेध केला तरी त्याचा पुतिन यांच्यावर थोडासाही परिणाम होण्याची शक्यता नाहीच. युक्रेनवरच्या हल्ल्यानंतरही पुतिन यांच्यावर टीकेची झोड उठली होतीच. युक्रेनच्या पाठीशी उभे राहून पुतिन यांना धडा शिकवण्याच्या गर्जना झाल्या. मात्र, युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे व युक्रेनला लष्करी सामुग्रीची मदत पुरविण्याशिवाय अमेरिका व युरोपीय देशांनी काहीही केलेले नाहीच.

त्यामुळे नव्हाल्नी यांच्या हत्येनंतर पुतिन यांना धडा वगैरे शिकवला जाण्याची शक्यता नाहीच. असो! ज्या अ‍ॅलेस्की नव्हाल्नी यांची हत्या (सरकारी भाषेत गूढ मृत्यू) झाला ती का झाली, हे समजून घ्यायचे तर नव्हाल्नी यांचा इतिहास तपासायला हवा. वास्तविक नव्हाल्नी हे काही उदारमतवादी वा लोकशाहीवादी वगैरे अजिबात नव्हते. ते कडवे वंशवादी व उजव्या विचारसरणीचेच होते. चेचन्यातील स्थलांतरित व गरीब मुसलमानांचा पराकोटीचा द्वेष करणारे, त्यांना झुरळ संबोधणारे व त्यांना कसे ठेचले पाहिजे हे अभिनय करून सांगणारे नव्हाल्नी होते. मात्र, त्यांनी पुतिन यांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध दंड थोपटल्यानंतर त्यांना मिळणारा पाठिंबा व सहानुभूती वाढली होती. ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या तत्त्वानुसार रशियात लोकशाही येण्याची इच्छा बाळगणा-या सामान्य रशियन नागरिकांनी नव्हाल्नी यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली होती. पुतिनशाहीने नव्हाल्नी यांचा हा विरोध दडपण्याचे सर्व प्रयत्न केले पण नव्हाल्नी बधले नाहीत. मिळेल त्या माध्यमातून पुतिनशाहीला प्रश्न विचारणे, भंडावून सोडणे, भ्रष्टाचार उघडकीस आणणे व आव्हान देत राहणे हे ते सातत्याने करत राहिले.

एकाधिकारशाहीत हे सोपे काम नक्कीच नाही. त्याची किंमत चुकवावीच लागते हे माहिती असूनही नव्हाल्नी लढत राहिले. त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली. कधी त्यांना औद्योगिक रंगांचा चेह-यावर झालेला हल्ला सहन करावा लागला तर कधी खोट्यानाट्या खटल्यांचा ससेमिरा सहन करावा लागला. तरीही त्यांनी पुतिन यांना आव्हान देऊन त्यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस केले. अर्थात निवडणुकीत यश मिळणे अशक्यच पण नव्हाल्नी यांनी पुतिनशाहीविरुद्धची लढाई नेटाने सुरूच ठेवली. पुतिन राजवटीने त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांना तुरुंगात डांबले.. तरीही बाहेर असलेल्या समर्थकांमार्फत मिळेल त्या माध्यमाचा वापर करून त्यांनी लढाई सुरू ठेवली. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी जर्मनीने त्यांना आश्रय दिला नसता तर त्यावेळीच ही लढाई संपुष्टात आली असती. खरं तर जीव वाचल्यावर रशियात परत न जाता परदेशातून आपली लढाई सुरू ठेवण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. मात्र, तो नाकारून ते रशियात परतले होते. तेव्हाच त्यांच्या कहाणीचा शेवट निश्चित झाला होता.

तो त्यांनाही माहीत होताच व तो त्यांनी निधड्या छातीने स्वीकारला. पुतिन हे कसे काय करू शकतात असा प्रश्न त्यांच्याविषयी अल्प माहिती असणा-यांना पडू शकतो. मात्र, ज्या पद्धतीने पुतिन यांनी आपली एकाधिकारशाही रशियात प्रस्थापित करून स्वत:ला तहहयात देशाचा हुकूमशहा म्हणून प्रस्थापित केले आहे ते पाहता अडवा येणा-याचा ते निर्दयपणे काटा काढणार हे स्पष्टच होते. त्यांच्या या अमानुष कृत्यांची यादी प्रचंड मोठी आहेच. त्यात आता नव्हाल्नी यांच्या नावाची भर पडली इतकेच! रशियाच्या अध्यक्षपदी तहहयात आपणच राहू अशी सोय घटनादुरुस्तीद्वारे पुतिन यांनी ज्या दिवशी करून घेतली व त्यास रशियातील शहाण्यांनी मौन बाळगून संमती दिली त्यावेळीच जगात आणखी एक हुकूमशहा जन्माला आला होता. आता काळच या हुकूमशहाला पदच्युत करू शकतो. त्या घडीची वाट पाहणे एवढेच जगाच्या हाती आहे, हे निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR