25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024

किंग कोहली

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघावर सर्वांनीच टीका केली. हा पराभव निराशाजनक होता यात शंकाच नाही; परंतु त्यामुळे संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य राहण्याचे मूल्य कमी होत नाही. त्याचबरोबर भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीने या स्पर्धेदरम्यान शतकांचा विक्रम मोडून काढत रचलेला नवा इतिहासही या पराभवामुळे झाकोळला जाऊन चालणार नाही. कारण असे विक्रम प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड क्षमता असावी लागते. विराटच्या विक्रमी ५० शतकांवेळी विव रिचर्डस आणि सचिन तेंडुलकर उपस्थित राहणे हे या शतकाचे महत्त्व आणखी वाढवणारे आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये किंग कोहली नावाने प्रसिद्ध असलेल्या विराटने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आदर्श सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्यांती ४९ शतकांचा विक्रम मोडत इतिहास घडविला. त्यावेळी साजरा केलेला जल्लोष पाहता त्याच्या खेळाची जागा सर्वांच्या पुढे आहे, हे क्रिकेट चाहत्यांना कळून चुकले. एकदिवसीय सामन्यात विक्रमी ५० वे शतक ठोकल्यानंतर स्टेडियममध्ये सामना पाहणा-या हजारो प्रेक्षकांसमवेत उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकरसमोर गुडघे टेकत त्याने आभार मानले. अर्थात करियरच्या प्रारंभी पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या साथीदार खेळाडूंनी गंमतीने त्याला सचिनच्या पाया पडायला लावले होते. परंतु त्याच्या मनात आदर्श व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना सारखीच आहे. विराट कोहली हा जेवढा सचिनचा आदर करतो, तेवढाच सचिनही त्याच्यावर नितांत प्रेम करतो. विक्रम मोडल्यानंतर सचिन म्हणाला, ‘‘जेव्हा आपण पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये विराटला भेटलो, तेव्हा साथीदारांनी त्याला माझ्या पाया पडायला लावले होते. त्यावेळी मला हसू रोखता आले नाही. पण त्याने ध्येय आणि कौशल्याच्या बळावर आपले मन जिंकले. आपण आनंदी असून एक तरुण खेळाडू आता विराट खेळाडू बनला आहे. एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडला आहे आणि आणखी आनंदाची बाब आहे.’’

आक्रमक क्रिकेटचा चेहरा म्हणून विवियन रिचर्डसकडे पाहिले जाते. त्यांच्याकडून ही बॅटन सचिनकडे आणि सचिनकडून विराट कोहलीकडे आली. विराटच्या विक्रमी ५० शतकांवेळी विव रिचर्डस आणि सचिन तेंडुलकर उपस्थित राहणे हे या शतकाचे महत्त्व आणखी वाढवणारे आहे. विराटचे या सामन्यातील शतक अत्यंत महत्त्वाचे होते. कारण हा आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील उपांत्य सामना होता आणि समोर असा संघ होता की तो ब-याच काळापासून टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यापासून रोखत होता. एवढेच नाही तर विराटच्या करियरमधील चौथा विश्वचषक उपांत्य सामना होता आणि या काळात त्याने दहा ते वीस धावा देखील करता आल्या नव्हत्या. मात्र यावेळी त्याने शतक ठोकून भारताला अंतीम सामन्यात नेण्यात मोलाची भूमिका बजावली. यावरून त्याला किंग कोहली का म्हणतात, हे प्रेक्षकांना आणि स्पर्धंक संघांना कळून चुकले. हा विक्रम नोंदविल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, ‘‘महान खेळाडू सचिन तेंडुलकरने माझे अभिनंदन करणे हे एखाद्या स्वप्नासारखे आहे. ही भावना इतकी संवेदनशील आहे की माझा विश्वासच बसत नाहीय.’’ यावरून त्याच्या मनात सचिनबाबत किती आदर आणि सन्मान आहे, हे कळतेच तसेच सचिनचा विक्रम मोडल्याने आनंदी असला तरी तो सचिनशी तुलना करणे त्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच आपल्या ३५ व्या वाढदिवसाच्या दिवशी सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी केल्यानंतर तो म्हणाला, आपण सचिनसारखे कधीही होऊ शकत नाही. तरीही तुलना होणे स्वाभाविक आहे.

सचिनने ४९ एकदिवसीय शतकांसाठी ४५२ डाव खेळले तर विराटने ५० शतकांचा पल्ला गाठताना २७९ डाव खेळले. विराटने २४ डिसेंबर २००९ मध्ये ईडन गार्डच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध पहिले शतक ठोकले. आतापर्यंत त्याने क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात ८० शतक ठोकले आहेत. सचिनप्रमाणे शतकांचे शतक गाठण्यासाठी त्याला वीस शतकांची गरज आहे. विराटने २०२३ पर्यंत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत आठ शतके झळकाविली आहेत. अशा प्रकारे तो खेळत राहिला तर तीन वर्षात तो हा पल्ला देखील गाठू शकेल. विश्वचषक स्पर्धेत सचिनचा सर्वाधिक ६७३ धावा करण्याचा विक्रम त्याने अगोदरच तोडला आहे. त्याने आतापर्यंत ७६५ धावा केल्या आहेत.
विराट हा अतुलनीय खेळाडू आहे. मात्र त्याला करियरमध्ये अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. भारताने २०२१ च्या टी-२० मध्ये चांगली कामगिरी न केल्याने त्याला कर्णधारपद सोडावे लागले. यावर बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी पांढ-यां चेंडूसाठी एकच कर्णधार असायला हवा, असे म्हणत दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दौ-यासाठी त्याला एकदिवसीय सामन्याच्या कर्णधारपदावरून देखील बाजूला केले. त्यावर त्याने कसोटीचे कर्णधारपद देखील सोडले. असे असताना त्याने आपल्या कामगिरीवर कधीही परिणाम होऊ दिला नाही.

या कारणांमुळेच तो आज संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. विराट कोहलीने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक केल्यानंतर तो बराच काळ पुढील शतकांसाठी झुंजत होता. यानंतर त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने अनेक टीकेचा त्याला सामना करावा लागला. विराटने बांगलादेशविरुद्ध शतक केल्यानंतर पुढील ८३ डावात त्याला एकही शतक करता आले नव्हते. मात्र कालच्या सामन्यांत त्याने ठोकलेले शतक पाहता ते दीर्घकाळ लक्षात ठेवले जाईल. विराटच्या आक्रमकतेबाबत नेहमीच बोलले जाते. परंतु त्याची आक्रमकता ही दोन प्रकारे दिसते हे आपण नेहमीच विसरतो. तो क्षेत्ररक्षण करतानाही आक्रमक राहतो आणि तिच त्याची खरी ओळख आहे. त्याचवेळी फलंदाजी करताना एक एक धाव ज्या रितीने चोरतो ती देखील त्याची आक्रमकताच आहे. हीच आक्रमकता कव्हर ड्राइव्ह, कट किंवा फ्लिक करताना दिसते. एवढेच नाही तर तो फिटनेसवरही विशेष लक्ष देतो. या क्षेत्रात टीम इंडियाचा झालेला कायापालट हा त्याच्यामुळेच झाला.

– नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR