पुणे : निलेश लंकेंच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गौप्यस्फोट केला असून मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी असे निलेश लंके यांनी आपल्याला म्हटले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि निलेश लंके निवडूनही आले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला. नगर लोकसभेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.
दरम्यान, अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके सुरुवातीला माझ्याकडून तयार होते. मात्र मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी, निलेश लंके यांनी केली होती, असे अजित पवार यांनी सांगितलं. निलेश लंकेंच्या उमेदवारीबाबत मी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ती जागा सोडू शकले नाही. ही जागा धोक्यात आहे, असेही मी त्यांना त्यावेळी सांगितले होते. मात्र भाजपच्या नेत्यांनी ऐकले नाही.