33.9 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयतहहयात पुतिन!

तहहयात पुतिन!

रशियात नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा संपूर्ण जगाला अपेक्षित असणारा निकाल अखेर सोमवारी आला व ब्लादिमीर पुतिन हे तहहयात रशियाच्या अध्यक्षपदी कायम राहणार हे सुस्पष्ट झाले आहे. अर्थात पुतिन यांचा हा विजय वा त्यांनी रशियावर मिळवलेला ताबा अनपेक्षित वगैरे अजिबात नाही. १९९९ मध्ये पहिल्यांदा रशियाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासूनच पुतिन यांच्यातली विखारी महत्त्वाकांक्षा जागृत झालेली होती व रशियात नव्या हुकूमशहाचा जन्म झाला होता. फक्त बदलत्या काळाप्रमाणे या हुकूमशहाने आपली हुकूमशाही राबविण्यासाठी, टिकविण्यासाठी व बळकट करण्यासाठी लोकशाहीची झूल पांघरली आहे.

रशियात एखाद्या व्यक्तीला केवळ दोन वेळा अध्यक्षपद भूषविता येते. मात्र, पुतिन अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्यांनी स्वत:साठी हा कायदाच बदलून घेतला व तहहयात रशियाचे अध्यक्षपद उपभोगण्यातील कायदेशीर अडसरच दूर केला. त्यामुळे आता सलग पाचव्यांदा पुतिन यांच्या हाती रशियाची सूत्रे आली आहेत. आपल्याला ८८ टक्के एवढी प्रचंड मते मिळाली, त्यातून रशियन जनतेचा आपल्याला असलेला पूर्ण पाठिंबा सिद्ध होतो, असा दावा हे पुतिन महाशय करीत असले तरी सध्याच्या घडीला त्यांचे विरोधक एकतर तुरुंगात आहेत किंवा यमसदनास धाडले गेलेले आहेत हे वास्तव रशियन जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगालाही चांगलेच ज्ञात आहे.

त्यामुळे रशियातील ही निवडणूक म्हणजे निवळ फार्सच हे जगाला चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. मात्र, बेपर्वा पुतिन त्याची अजिबात पर्वा करत नाहीत आणि या हुकूमशहाचे अमेरिकेसहित जग काहीही वाकडे करू शकत नाही, हे आणखी एक विदारक वास्तव आहे. त्यामुळेच पाचव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होताच पुतिन यांनी जगाला थेट तिस-या महायुद्धाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मागच्या दोन वर्षांपासून त्यांनी युक्रेनवर लादलेले युद्ध लवकर संपण्याची शक्यता आता पुरती मावळली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या सैनिकांनी रशियाच्या सीमेलगत युद्धसराव सुरू केला आहे. त्यावरून पुतिन पुरते आक्रमक झाले आहेत. नाटोच्या फौजा थेट रशियाच्या फौजेशी भिडल्या तर तिसरे महायुद्ध अटळ आहे, अशी धमकीच पुतिन यांनी जगाला दिली आहे. पुतिन यांचा हा इशारा वा धमकी म्हणजे त्यांच्यातील हुकूमशहाचा दर्पच आहे! विशेष म्हणजे या निवडणुकीत पुतिन यांनी युद्धात युक्रेनच्या ज्या प्रांतावर ताबा मिळविला आहे तेथेही मतदान घेतले.

लष्कराने घरोघरी मतपेट्या नेऊन युक्रेनच्या नागरिकांना मतदान करण्यास बाध्य केले. त्यावरून युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की संतप्त झाले आहेत व त्यांनी पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालविण्याची मागणी केली आहे. अमेरिकेसह सर्वच पाश्चिमात्त्य देशांनी रशियातील ही निवडणूक केवळ फार्स आहे, त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही, अशीच टीका केली आहे. मात्र, पुतिन यांनी अत्यंत खोचक उत्तरे देऊन ही टीका पूर्णपणे उडवून लावली आहे. पाचव्यांदाची अध्यक्षपदाची ही सहा वर्षांची टर्म पूर्ण केल्यास पुतिन कार्यकाळाच्या तुलनेत जोसेफ स्टालिन यांना मागे टाकतील व मागच्या २०० वर्षांच्या काळात सर्वाधिक काळ देशाच्या प्रमुखपदावर असणारा नेता, हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला जाईल. पाचव्यांदा देशाची सूत्रे बिनबोभाट हाती घेतल्यावर जो अतिआत्मविश्वास येतो त्यातूनच पुतिन यांनी जगाला तिस-या महायुद्धाचा इशारा दिला आहे. थोडक्यात जगातील तमाम लोकशाहीवादी राष्ट्रांना या नव्या हुकूमशहाला तोंड देण्याची तयारी गांभीर्याने करावी लागणार आहे. रशियाच्या या हुकूशहाला चीनच्या हुकूमशहाचे समर्थन आहेच.

निवडणुकीतील विजयाबद्दल पुतिन यांचे अभिनंदन करताना चीनने ‘अमेरिकेने रशियावर हल्ला केल्यास चीन रशियाच्या मदतीस लष्कर पाठवेल’, असे जाहीर करत एकप्रकारे पुतिन यांच्या युद्धखोरीचे समर्थनच केले आहे. पुतिन यांचे कट्टर विरोधक अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांचा मागच्या महिन्यातच तुरुंगात गूढ मृत्यू झाला होता. पुतिन यांचा देशात राहून कट्टर विरोध करणारे ते शेवटचेच विरोधक! बाकीचे विरोधक एकतर इतर देशांच्या आश्रयाला तरी गेले अन्यथा त्यांची जीवनयात्रा संपविण्यात आली. नवाल्नी यांच्या पत्नीने या निवडणुकीत पुतिन यांना शक्य तेवढा विरोध नेटाने केला. मात्र, या विरोधाचा फारसा फरक पुतिन यांच्यावर पडण्याची शक्यता नव्हतीच. कारण त्यांच्या विरोधात निवडणूक मैदानातील तीनही उमेदवार पुतिन यांचे डमी विरोधक एवढ्याच पात्रतेचे होते. सक्षम पर्यायच नसल्याने मतदारांनी पुतिन यांना निवडले, असे मानणा-यांचाही मोठा प्रवाह आहे. नवाल्नी यांचे मित्र व पुतिन यांचे विरोधक असणा-या लियोनिड वोल्कोफ यांच्यावर हातोड्याने हल्ला झाला होता. ते सध्या लिथुआनियाचे शरणार्थी आहेत. रशियातील निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी या निवडणुकीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

नवाल्नी यांच्या समर्थकांनी रशियन दूतावासासमोर निषेध व्यक्त केला मात्र तो किरकोळच ठरला. जर्मनीने ‘बनावट निवडणुका’ अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमेरॉन यांनी युक्रेनमध्ये झालेले मतदान बेकायदा ठरवले. मात्र, जगभरातून होत असलेल्या या टीका वा निषेधाचा पुतिन यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. ते निश्चल व बेपर्वा आहेत. उलट ‘पाश्चिमात्त्य देशांपेक्षा रशियातील लोकशाही अधिक मजबूत व पारदर्शी आहे. दहा डॉलरमध्ये मते खरेदी करावीत अशी आमची अमेरिकी निवडणूक नव्हती’, असे सणसणीत व खोचक उत्तर पुतिन यांनी अमेरिका व पाश्चात्त्य देशांना दिले आहे. थोडक्यात लोकशाहीच्या बुरख्याआडच्या या हुकूमशहावर शाब्दिक प्रहार, टीका वा निषेधाचा काही परिणाम होण्याची शक्यता नाही, हे स्पष्टच आहे. पूर्वाश्रमीचा सोव्हिएत महासंघ पुन्हा निर्माण करायचा या आसुरी महत्त्वाकांक्षेने या नव हुकूमशहाला ग्रासलेले आहे व त्यामुळे पुतिन यांची युद्धखोरी थांबण्याची शक्यता नाहीच. जगात शांतता हवी तर जगाला एकत्रितरीत्या या हुकूमशहाचे नाक दाबावे लागेल, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR