34 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeराष्ट्रीयकलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मिरात निवडणूक

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मिरात निवडणूक

श्रीनगर : १८ व्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जम्मू-काश्मीरमधील पाच जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे, तर लडाखमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

सन २०१४ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होतील, अशी आशा होती. पण, ती फोल ठरली. दोन्ही निवडणुका एकाच वेळी न घेण्यामागे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सुरक्षेचे कारण दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नाही. जम्मू-काश्मीर(५) आणि लडाख (१) हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश मिळून लोकसभेच्या ६ जागा आहेत. गतवेळी यातील तीन जागा भाजपने, तर तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या होत्या. येथे भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष, तर मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी व फारूख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पार्टी हे प्रादेशिक पक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जम्मू-काश्मीरचा दौरा केला.

प्रचारातील प्रमुख मुद्दा
जम्मू-काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे. येथे विधानसभाही आहे. लडाख केंद्रशासित प्रदेश करण्यात आला असून, तेथे विधानसभा नाही. केंद्रशासित प्रदेशामुळे नागरिकांना केंद्राच्या हस्तक्षेपाची भीती वाटते. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संरक्षण देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्याचा दर्जा हा प्रचारातील प्रमुख मुद्दा असणार आहे.

जागावाटपावरून रस्सीखेच
जम्मू आणि काश्मीरमध्येदेखील इंडिया आघाडीत जागावाटपावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. मेहबूबा मुफ्तींचा पीडीपी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तिस-या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे फारूख अब्दुला पीडीपीला जागा देण्यास तयार नाहीत. काँग्रेसकडून आघाडी करण्यावर भर असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे लडाख, जम्मू आणि उधमपूर हे ंिहदूबहुल मतदारसंघ असल्याने भाजपचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे इंडिया आघाडीला एकजुटीशिवाय पर्याय नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR