छ. संभाजीनगर : मागील काही वर्षांपासून वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात मक्याच्या पे-यात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली; परंतु, पिके बहरात आली असताना पावसाने दडी दिल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे.
सध्या मका पिकाची यंत्राद्वारे मुरघासासाठी कुटी करून १,७०० रुपये टनाप्रमाणे विक्री होत आहे. तर मक्याच्या कणसाला दाणे नसल्याने केलेला खर्चही निघत नाही, यामुळे रबीची पेरणीचीही चिंता शेतक-यांना सतावत आहे.
अलीकडच्या काळात शिऊर परिसरात मका पीक प्रमुख बनले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याचा पेरा झाला होता. मागील दोन ते तीन वर्षांत उत्पन्न ब-यापैकी मिळाल्याने मका पेरणी जास्त केली. मात्र, सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे पिके वाया गेली. आता तरझालेला खर्चही निघाला नाही.
शिऊर परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप हंगामात पाऊस तब्बल एक ते दीड महिना उशिराने झाला. यामुळे मका व इतर पिकांच्या पेरण्याही उशिराने झाल्या. दरम्यान, रिमझिम पाऊस पडत गेला अन् पिके जोमाने वाढली; परंतु, जुलैअखेर व संपूर्ण ऑगस्ट महिना अशी एक ते दीड महिना पावसाने दडी दिली. यामुळे जोमात आलेल्या मका पिकाचे नुकसान झाले असून कणसांमध्ये दाणे भरलेच नाहीत.