30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाचे खराब प्रदर्शन

टीम इंडियाचे खराब प्रदर्शन

लखनौ : अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर भारतीय संघाने खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले. स्पर्धेत पाचही सामने शानदाररीत्या जिंकणारा भारतीय संघ सहाव्या सामन्यात मात्र ढेपाळला. कर्णधार रोहित शर्माने ८७ धावा काढल्या हीच काय ती जमेची बाब. अन्य रथी-महारथींनी लौकिकाला साजेशी फलंदाजी केली नाही. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली.

वाजपेयी स्टेडियमची खेळपट्टी दुटप्पी निघाली. कधी चेंडू खाली रहात होता तर कधी अचानक उसळत होता. विराट कोहलीला तर भोपळाही फोडता आला नाही. शुभमन ९, श्रेयस अय्यर ४ तर के. एल. राहुलने ३९ धावा काढल्या. भरवशाचा जडेजाही ८ धावांवर परतला. सूर्यकुमार यादवने ४९ धावांचे योगदान दिले. बुमराने १६ धावा काढल्याने भारताला सव्वा दोनशेचा टप्पा गाठता आला. इंग्लंडच्या विली, वोक्स आणि मार्क वुडने भन्नाट वेगवान मारा केला. तिघांनी ६ विकेटस् काढल्या.

रोहित-गिलने सलामी दिली. नेहमीप्रमाणे रोहितने फटकेबाजी सुरू केली होती. २४ चेंडूत २६ धावांची सलामी झाली. पण गिलला दुस-या बाजूने साथ देता आली नाही. अवघ्या ९ धावा काढून तो वोक्सच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. धावसंख्येत एका धावेची भर पडली आणि विराटने गाशा गुंडाळला. ९ चेंडूत त्याला भोपळाही फोडता आला नाही. विलीचा चेंडू मिड ऑफवरून टोलवण्याच्या नादात तो झेलबाद झाला. विलीकडे वेग नाही परंतु तो अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. पहिल्या पावर प्लेमध्ये फक्त ३५ धावा निघाल्या.

श्रेयस अय्यर रोहितला साथ देईल असे वाटले होते परंतु शॉर्ट पिच चेंडूने पुन्हा एकदा त्याचा घात केला. अशा चेंडूवर हुक मारण्याची वाईट खोड त्याला लागली आहे. भारताची धावगती कमालीची मंदावली होती. अवघ्या ४ धावा काढून श्रेयस वोक्सच्या चेंडूवर वुडद्वारा झेलबाद झाला. रोहित आणि के. एल. राहुल जोडी संघाला संकटातून बाहेर काढेल असे वाटले होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारीही केली होती. पण विलीचा चेंडू उचलून मारण्याच्या नादात राहुल बाद झाला. त्याने ५८ चेंडूत ३ चौकारांसह ३९ धावा काढल्या. दरम्यान रोहितचे अर्धशतक पूर्ण झाले होते आणि त्याची वाटचाल शतकाकडे सुरू होती. धावसंख्येत ३३ धावांची भर पडली आणि रोहितही बाद झाला. ३६.५ षटकांत ५ बाद १६४, लेग स्पीनर अदिल रशीदच्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या नादात रोहित बाद झाला. लिव्हिंगस्टोनने सुरेख झेल घेतला. रोहितने १०१ चेंडूत ८७ धावा काढताना १० चौकार आणि ३ षटकार ठोकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR