वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफवरुन बोंबाबोंब सुरु केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली असून भारताने रशियन तेलाच्या मुद्यावर सहकार्य केले नाही, तर भारतीय सामानाच्या आयातीवर सध्या असलेला टॅरिफ पुन्हा वाढवेन अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
सध्या अमेरिकेत आयात होणा-या भारतीय साहित्यांवर ५० टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यामुळे रशियाला युक्रेन विरोधात युद्ध सुरु ठेवण्यासाठी आर्थिक बळ मिळते असा ट्रम्प यांचा दावा आहे. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यापासून ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत आयात होणा-या भारतीय साहित्यावर ५० टक्के टॅरिफ आकारण्यास सुरुवात केली. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे भारताला आर्थिक आघाडीवर धक्का बसलाच. पण भारतीय व्यावसायिकांनी आपल्यासाठी अन्य बाजारपेठा शोधून काढल्या. त्यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढवण्याच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षे इतका मोठा फटका बसला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी एक चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहिती आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष खुश नाहीयत. मला खुश करणे गरजेचे आहे. त्यांनी व्यापार सुरु ठेवला, तर आम्ही लगेच टॅरिफ वाढवू व्हाइट हाऊसने शेअर केलेल्या ऑडिओमध्ये ट्रम्प असे बोलताना ऐकू येत आहे. अमेरिकेने शुक्रवारी रात्री व्हेनेझुएलावर हल्ला चढवून त्यांचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले. अमेरिकेने शेजारच्या दक्षिण अमेरिकेत असलेल्या वेनेझुएलावर हल्ला करण्यामागे तेल हे एकमेव कारण आहे.
दबाव टाकण्याच्या रणनितीचा भाग
भारत-अमेरिका संबंध ताणले जाण्यामागे तेल हेच कारण आहे. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर चर्चेच्या फे-या सुरु आहेत. ट्रम्प यांची ताजी धमकी ही दबाव टाकण्याच्या रणनितीचा भाग असू शकते. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताची रशियाकडून तेल आयात आणि मूल्य दोन्ही बाबतीत सहामहिन्याच्या उच्चतम पातळीला पोहोचली आहे. भारताची रशियाकडून होणारी तेल खरेदी ३५ टक्क्यापर्यंत वाढली आहे. भारताची भूमिका तटस्थतेची आहे. त्यामुळे भारत फक्त रशियाकडून तेल खरेदी करतो असे नाहीय, तर अमेरिकेकडून सुद्धा भारताने तेल खरेदी वाढवली आहे.

