23.9 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeधाराशिवदेवीच्या मंचकी निद्रेस उद्यापासून प्रारंभ

देवीच्या मंचकी निद्रेस उद्यापासून प्रारंभ

तुळजाभवानी मंदिर, ३ ऑक्टोबरपासून शारदीय महोत्सव

धाराशिव : प्रतिनिधी
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास ३ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने सुरुवात होणार आहे. त्या अगोदर मंगळवार, दि. २४ सप्टेंबरपासून देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे तर १३ ऑक्टोबरला सिमोल्लंघनाने तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप होणार आहे. त्यामुळे आता देवीच्या भक्तांनी नवरात्रोत्सवाची तयारी सुरू केली आहे.

तुळजाभवानी मंदिर प्रशासन आणि तुळजापूर नगरपालिका प्रशासनाने तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वतयारी जवळपास पूर्ण केली आहे. २४ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी मंचकी निद्रा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचदिवशी दुपारी १२ वाजता मंदिरात विधीवत घटस्थापना केली जाणार आहे. त्यानंतर ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत.

त्यानुसार पहिल्या दिवशी रथालंकार, त्यानंतर मुरलीअलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार आणि शेवटी महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा देखाव्यासह मांडली जाणार आहे. नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात रोज तुळजाभवानी देवीचा छबीना मिरवणुकीचा धार्मिक विधी पार पडणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी धार्मिक विधी पार पडल्यानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी रात्री नगरहून येणा-या मानाच्या पलंग पालखीसमवेत मिरवणूक आणि १३ ऑक्टोबरला पहाटे विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन होणार आहे.

पालखीवर यंदा फुलांची उधळण
तुळजापूर येथे सिमोल्लंघनात देवीच्या पालखीची मिरवणूक निघते. यावेळी पालखीवर यंदा कुंकवाऐवजी फुलांची उधळण करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला. या निर्णयाचे भक्तांमधून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, सिमोल्लंघनानंतर देवीची श्रमनिद्रा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR