32.8 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रबंडखोरी रोखण्यासाठी मनधरणी

बंडखोरी रोखण्यासाठी मनधरणी

महायुतीत कसरत, फडणवीसांची टीम लागली कामाला

मुंबई : प्रतिनिधी
महायुतीत तीन पक्ष एकत्रित आल्याने ब-याच ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यातल्या त्यात भाजपलाच याचा फटका बसत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेत्यांची नाराजी दूर करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे भाजपची दुसरी टीम बंडखोर नेत्यांची मनधरणी करीत आहे. हिंगोलीत रामदास पाटील यांच्यासह शिवाजी जाधव, श्याम भारती यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते आज हिंगोलीत आले होते. तसेच बुलडाण्यातही विजयराज शिंदे यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हिंगोलीत भाजपने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले होते. त्यामुळे येथे हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली असताना भाजपच्या दबावामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली आणि तिथे आता बाबूराव कदम कोहळीकर यांना मैदानात उतरविले. परंतु तरीही भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माजी खासदार शिवाजी जाधव, श्याम भारती हेही नेते नाराज आहेत. त्याचा फटका शिंदे गटाच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे भाजपमधील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन आज हिंगोलीत दाखल झाले आणि त्यांनी येथील मिलिंद यंबल यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमधील नाराजांची मनधरणी केली. परंतु भाजपचे बंडखोर नेते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार श्रीकांत भारतीय दाखल झाले. उशिरापर्यंत त्यांच्यात चर्चा सुरूच होती.

दुसरीकडे बुलडाण्यात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप जाधव यांची अडचण झाली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट विजयराज शिंदे यांना अर्ज मागे घेऊन युतीधर्म पाळावा, असे आदेश दिले आहेत. आता ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. यासोबतच कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा वाद सुरू होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदेना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथील वादावर पडदा पडला आहे.

दिंडोरीत चव्हाण यांची बंडखोरी?
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मंत्री भारती पवार यांना भाजपकडून सलग दुस-यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज झाले आहेत. आता त्यांनी दिंडोरी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

शिरुरमध्ये भाजपला धक्का
शिरुरमध्ये राष्ट्रवादीने आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढली असून, खेड आळंदी विधानसभेचे भाजप समन्वयक अतुल देशमुख यांनी थेट राजीनामा देत आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन मी बाहेर पडत आहे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR