छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. आपली प्रकृती चांगली आहे. मी ठणठणीत आहे. काळजी करू नका. डॉक्टरांनी मला ठणठणीत बरे केले आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु आता चांगले दिवस आले आहेत. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी आपण काय, काय करणार आहोत, ते त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौ-यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे.
उद्रेक होईल असे आंदोलन करू नका
आपले आंदोलन शांततेचे आणि लोकशाही मार्गाचे आहे. उद्रेक होईल, असे काही करू नका. कोणी आत्महत्या करू नका. २४ डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावे लागणार आहे. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झाला आहे. हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले नाही. आम्हाला शेती पाहायची आहे आणि मुलांसाठी काम करायचे आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.