22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरजरांगेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक

जरांगेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक

बीड : बीडमध्ये समस्त मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरूर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे यांना अनुसरून वादग्रस्त विधान केले होते. याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर ते पोलिस अधीक्षक कार्यालयावर मराठा बांधवांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सध्या जिल्ह्यात सोशल वॉर रंगल्याचे चित्र आहे. अनेकदा दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच पोलिसांचा या सर्व परिस्थितीवर वॉच असून शांतता राखण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र हे सोशल वॉर अद्याप थांबलेले नाही.

आज पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ ‘परळी बंद’ची हाक असताना दुसरीकडे बीडमध्ये जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. दशरथ वनवे यांनी केलेले विधान हे आक्षेपार्ह असून त्यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी तसेच वनवेंना अटक करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ८ जूनपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारच्या मराठा समाजासंदर्भातील धोरणांवर मनोज जरांगे यांचे अद्याप समाधान न झाल्याने ते उपोषण सुरूच ठेवणार आहेत. ‘मेलो तरी चालेल पण मराठा आरक्षण मिळवणारच’असा चंगच मनोज जरांगे यांनी बांधला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR