मुंबई : प्रतिनिधी
मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. यंदाचा मराठी चित्रपट महोत्सव मुंबईत आयोजित करण्यात आला असून तो ३ दिवस चालणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, यावेळी ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक तसेच बाल कलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.
गेल्या ६० वर्षांपासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत राज्य सरकार अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना आशिष शेलार यांनी मांडून त्याला मूर्त स्वरूप दिले आहे.
जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत, असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट प्रेक्षकांशी संवाद साधेल. यानिमित्त काही विशेष परिसंवाद आणि या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात होतील. याबाबतच्या तारखा आणि नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने
सन २०२२ या वर्षातील ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) आणि अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.
उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन), ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.
५० प्रवेशिका प्राप्त
पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.