32.6 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी माणसाने जातीच्या भिंती उद्ध्वस्त करून एकत्र यावे

मराठी माणसाने जातीच्या भिंती उद्ध्वस्त करून एकत्र यावे

राज ठाकरे यांची बाबासाहेबांना मानवंदना

मुंबई : प्रतिनिधी
मराठी माणसाने मराठी म्हणून एकत्र येत जातीच्या भिंती उद्ध्वस्त केल्या पाहिजेत. मराठी म्हणून एकत्र येत या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणे हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे योग्य स्मरण ठरेल अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही असे सांगत बाबासाहेबांनीच विरोधकांना त्याकाळी सडेतोड उत्तर दिले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील बाबासाहेबांचे योगदान कधीच विसरता येणार नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

एक्स या सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर राज ठाकरे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पोस्ट करून त्यांना मानवंदना दिली आहे. आपल्या या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकेच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसे सडेतोड उत्तर दिले होते, याचे स्मरण होणे आवश्यक आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितले होते. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असे सांगितले होते. इतकेच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनले. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे.

स्वत: बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावे या मागणीला पाठींबा देणारे निवेदन दिले होते. बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणे केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असे होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही.

आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? असा सवाल करत एकत्र येण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR