मुंबई : विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असून, आजच्या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत.
आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या बैठकीत आम्ही केला असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.
भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प
वेणुगोपाल म्हणाले की, राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोट निवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. पण तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपाचा अयोध्येनंतर बद्रिनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताही राज्यातील भ्रष्ट आणि असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करणार आहे असे चित्र राज्यात आहे.
पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना खा. के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.