नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दिल्लीतील कर्तव्य पथावरील ‘मेरी माटी, मेरा देश’ अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधान मोदींनी भारत कलशात देशभरातून आणलेली माती टाकून शूर पुरुष आणि महिलांना श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान त्यांनी ‘मेरा युवा भारत’ पोर्टलही सुरू केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ‘जो मातीचे ऋण फेडतो, त्यालाच जीवन आहे. म्हणूनच इथे आलेले अमृत कलश, त्यातील प्रत्येक माती अनमोल आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीम हे भारतातील तरुण कसे संघटित होऊन प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात याचे उदाहरण आहे. देशातील प्रत्येक गावातील आणि प्रत्येक गल्लीतील करोडो तरुण या मोहिमेत सहभागी झाले आहेत. देशभरात लाखो कार्यक्रम घडले आणि असंख्य भारतीयांनी त्यांच्या अंगणातून आणि शेतातील माती स्वतःच्या हातांनी अमृत कलशात ओतली.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून आलेल्या हजारो अमृत कलश यात्रेकरूंना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. ज्याप्रमाणे देशवासी दांडीयात्रेत सामील झाले होते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात एवढी मोठी लोकसहभागाची गर्दी पाहून नवा इतिहास घडला, असे ते म्हणाले. ‘मेरा युवा भारत’ संस्थेच्या पायाभरणीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, २१ व्या शतकात राष्ट्र उभारणीत ही संघटना मोठी भूमिका बजावणार आहे.
चार कोटी सेल्फी अपलोड
‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेअंतर्गत ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २,३०,००० हून अधिक शिलपट्टे तयार करण्यात आले आहेत. या मोहिमेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुमारे चार कोटी सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत.