ऐझॉल : मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा हे त्यांच्या जागेवरून निवडणूक हरले आहेत. झोरम पीपल्स मूव्हमेंटचे (झेडपीएम) लालथनसांगा हे ऐझॉल पूर्व १ मधून दोन हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. झेडपीएमने चांगली कामगिरी करत ४० पैकी २७ जागा जिंकल्या आहेत. तर झोरमथांगाच्या मिझो नॅशनल फ्रंटने (एमएनएफ) नऊ जागा जिंकल्या आहेत. एमएनएफ १ जागेवर आघाडीवर आहे. भाजप दोन तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा असून बहुमताचा आकडा २१ आहे.
मिझोराम विधानसभेत सत्तांतर झाले आहे. झोरम पीपल्स मूव्हमेंट राज्यात सरकार स्थापन करणार असून झेडपीएमने २७ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट १० जागांवर मर्यादित राहिला. भाजप २ जागांवर आघाडीसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. मिझोराममध्ये सीएम झोरमथंगा यांची एमएनएफ सत्तेत होती.
माजी आयपीएस असलेल्या लालदुहोमा यांनी झोरम राष्ट्रवादी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. ते याच माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. दुसरीकडे, लालदुहोमांच्या पक्षाने राज्यातील इतर पाच छोट्या पक्षांसोबत युती केली. ज्यानंतर त्या युतीचे राजकीय पक्षात रूपांतर झाले, जे झेडपीएम (झोरम पीपल्स मूव्हमेंट) पार्टी या नावाने २०१७ मध्ये अस्तित्वात आले.