नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी तरुण आणि खेळाडूंशी व्हर्च्युअल संवाद साधतील. हा कार्यक्रम २९ ऑगस्ट रोजी साजरा होणा-या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात येत आहे.
मोदींचे संबोधन क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रव्यापी खेलो इंडिया संवाद-खेळाची बात, पीएमसोबत या कार्यक्रमाचा भाग असेल. हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दोन दिवस आधी आयोजित केला जाईल. २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे दिग्गज खेळाडू ध्यानचंद यांची जयंती असते. याच दिवशी देशात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, पंतप्रधानांच्या स्वातंर्त्यदिनाच्या संदेशातील खेळ आणि युवा शक्तीशी संबंधित मुख्य अंश देखील दाखवले जातील. त्यानंतर पंतप्रधान देशभरातील तरुणांना व्हर्च्युअल संबोधित करतील. या उपक्रमांतर्गत देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी तरुण, खेळाडू आणि शैक्षणिक संस्था एकत्र येत आहेत, असे ते म्हणाले. आयआयटी, आयआयएम, एनआयटी, एम्स प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांसह अनेक मोठ्या शिक्षण संस्था या राष्ट्रव्यापी अभियानात सहभागी होत आहेत.
मांडविया यांच्या मते, हा कार्यक्रम खेळात रुची असलेल्या तरुणांमध्ये आणि देशाच्या धोरणकर्त्यांमध्ये थेट संवाद साधण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. यामुळे तरुणांना त्यांचे विचार, अनुभव आणि सूचना सामायिक करण्याची संधी मिळेल. कार्यक्रमाची सुरुवात माय भारतच्या स्वयंसेवकांच्या स्वागताने होईल. यानंतर, गेल्या १२ वर्षांत भारताच्या क्रीडा प्रणालीत झालेल्या बदलांवर एक विशेष व्हीडीओ दाखवला जाईल. पंतप्रधानांच्या भाषणानंतर देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी प्रत्यक्ष कार्यक्रमांना सुरुवात होईल.
दिल्लीत चार-पाच ठिकाणी कार्यक्रम
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हे आयोजन चार-पाच ठिकाणी केले जाईल. यात आयआयटी दिल्लीचाही समावेश आहे, जिथे मांडविया कार्यक्रमात उपस्थित राहतील. मांडविया म्हणाले, मी २७ ऑगस्ट रोजी आयआयटी दिल्ली येथे होणा-या कार्यक्रमात उपस्थित राहीन. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्यासह भारताचे सध्याचे आणि माजी खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेतेही युवकांशी संवाद साधतील. या खेळाडूंमध्ये मनिका बत्रा, दीपा कर्माकर, सायना नेहवाल, गगन नारंग, श्रीजेश, मेरी कोम, बायचुंग भुतिया, पुलेला गोपीचंद, अंजू बॉबी जॉर्ज, कर्णम मल्लेश्वरी आणि मीराबाई चानू यांचा समावेश आहे. काही क्रिकेटपटूही युवकांशी संवाद साधतील.
















