नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीविषयी वक्तव्य केले होते. हे वक्तव्य निराधार असल्याने त्याचा महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे आज निषेध करण्यात आला. यासंदर्भात महात्मा फुले जयंती समितीचे पदाधिकारी पंचवटी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ जमले. या पदाधिका-यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा देत आंदोलन केले.
पदाधिका-यांनी महात्मा फुले यांचा जयघोष देखील केला. यावेळी समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते. श्री भागवत यांनी इतिहासाची मोडतोड केली आहे. त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. त्यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले की, अनवधानाने केले हे माहिती नाही. मात्र त्यांनी अखिल भारतात नावाजलेले समाजसुधारक व बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेले महात्मा फुले यांचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते.
इतिहासात लोकमान्य टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली असे प्रमाण नाही. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी रायगड किल्ला जिंकला. त्यानंतर १८६९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे रायगडावर गेले होते. तेथे त्यांनी परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला.