23.7 C
Latur
Tuesday, July 1, 2025
Homeराष्ट्रीय१२ जूनपासून मान्सून सक्रिय?

१२ जूनपासून मान्सून सक्रिय?

हवामान खात्याची माहिती

नवी दिल्ली/ पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण, जून महिन्याची ८ तारीख गेली पण अजूनही अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान, १२ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि वायव्य भारतात सुमारे एक आठवडा उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, पुढील पाच दिवसांत दिल्लीत तापमानाचा पारा ३-४ अंश सेल्सिअसने वाढेल. शनिवारी येथील तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले होते.

गेल्या एका आठवड्यापासून मान्सून पुढे गेलेला नाही. कोरड्या हवेच्या अडथळ्यामुळे २९ मे पासून मान्सून पुढे गेलेला नाही. आता १२ ते १८ जून या आठवड्यात मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे. देशातील अनेक भागांमध्ये अजूनही तेवढी उष्णता कमी झालेली नाही. याचे कारण नैऋत्य मान्सूनचे लवकर आगमन आहे. साधारणपणे जूनच्या अखेरीस मान्सून देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचतो. तो ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो.

दिल्लीत मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणपणे २७ जून असते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन म्हणाले की, १२ जूनपर्यंत मान्सून खूपच कमकुवत राहील. याचे कारण कमकुवत मान्सूनचा प्रवाह आणि वायव्य दिशेकडून कोरड्या हवेचा प्रवेश आहे. आता मान्सूनच्या प्रगतीदरम्यान बराच विराम दिसून आला आहे. जूनच्या तिस-या आठवड्यात मान्सून पुन्हा पुढे सरकेल असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र वगळता उष्णतेची लाट
भारतीय हवामान खात्याने विविध राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानचा समावेश आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, देशाच्या विविध भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी असले तरी, पुढील चार ते पाच दिवसांत ते बदलेल. राजस्थानमध्ये ९ जूनपासून आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात १० जूनपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR