जयपुर : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. कोणत्याही चेहऱ्याविना निवडणूक लढवल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, प्रदेश प्रभारी अरुण सिंह आणि पक्ष आणि संघटनेचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सहाहून अधिक नावे चर्चेत आहेत. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या घरी हालचाली वाढल्या आहेत. वसुंधरा राजे यांनी सोमवारी वीसहून अधिक आमदारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
वसुंधरा राजे यांच्याकडे राज्याची कमान येणार की भाजपकडून कोणी नवा चेहरा मुख्यमंत्री होणार, हा प्रश्न अजूनही कायम आहे. दरम्यान, वसुंधरा राजे यांनी समर्थक आमदारांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक पर्नामी आणि माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत यांनीही वसुंधरा राजे यांची भेट घेतली आहे. वसुंधरा राजेंना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी आलेले वैर मतदारसंघाचे आमदार बहादूरसिंह कोळी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जनतेची मागणी वसुंधरा राजे या आहेत. त्यांना मुख्यमंत्री बनवायला हवे. आम्ही त्यांना बळ देण्यासाठी आलो आहोत.