24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रगिरणा नदीपात्रातील ड्रग्ज शोधासाठी मुंबई पोलिस पुन्हा नाशिकमध्ये

गिरणा नदीपात्रातील ड्रग्ज शोधासाठी मुंबई पोलिस पुन्हा नाशिकमध्ये

पाणी सोडून ड्रग्ज शोधणार, टीम नदीवर पोहोचली!

नाशिक : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणी सातत्याने नवी माहिती समोर येत असून काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यातील गिरणा नदीत मुंबई पोलिसांकडून शोध मोहीम करण्यात आली होती. यावेळी पाणी जास्त असल्याने ड्रग्ज सापडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आले होते. आता पुन्हा एकदा ड्रग्जच्या शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधा-यातील पाणी सोडून शोध घेतला जाणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाशी संपर्क साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक ड्रग्ज प्रकरणात नाशिक पोलिसांसह मुंबई पोलिस, पुणे पोलिस सातत्याने नवनवी माहिती समोर आणत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान असणा-या गिरणा नदीच्या पात्रात ड्रग्जचा मोठा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गिरणा नदी गाठत तब्बल १० ते बारा तास शोधमोहीम केली होती. अगदी कॅमे-याच्या माध्यमातून हे सर्च ऑपरेशन सुरू होते. मात्र त्यावेळी नदीत पाणी जास्त असल्याने ड्रग्ज शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली होती. आता पुन्हा मुंबई पोलिसांची टीम गिरणा नदीवर पोहोचली असून नव्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखान्यामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतूने गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. त्याचबरोबर गिरणा नदीजवळील सरस्वती वाडीच्या आसपास १५ किलो ड्रग्ज लपवून ठेवल्याचे देखील समोर आले होते, ते पोलिसांनी हस्तगत केले होते. मात्र नदीपात्रात फेकून दिलेले ड्रग्ज काही केल्या सापडले नव्हते. यासाठी नदीपात्रात कॅमेरे सोडण्यात आले होते, मात्र तरीदेखील काहीही हाती आले नव्हते. पाणी जास्त असल्याने शोधण्यात अडथळे येत होते. अखेर सकाळपर्यंत चाललेली शोधमोहीम थांबविण्यात आली होती. आज पुन्हा गिरणा नदीत फेकलेले ड्रग्ज शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. आता ड्रग्जच्या शोधासाठी गिरणा नदीवरील साठवण बंधा-यातील पाणी सोडून ड्रग्जचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी मुंबई पोलिस आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाणी सोडण्याबाबत पत्रव्यवहार झाल्याचे समोर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR