मुंबई : सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त करण्याचे निर्देश आणि फटाक्यांच्या चाचणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे यंदा जोरदार धूमधडाका झाला. फटाक्यांची जोरात विक्री झाली. मुंबईत दिवाळीसाठी आतापर्यंत ५०० कोटींच्या फटाक्यांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
दिवाळी म्हणजे फटाके असे समीकरणच झाले आहे. दरवर्षी फटाक्यांच्या खरेदीत वाढ होत असल्याचे दिसते. पर्यावरणपूरक आणि फटाकेमुक्त दिवाळीचा नारा देण्यात येत असला तरी यंदा त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही.
यंदा तर फटाक्यांची आतषबाजी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढल्याचे दिसले. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत सुमारे ४०० कोटींच्या फटाक्यांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांत त्यातील १५० कोटी रुपयांचे फटाके वाजले. आतापर्यंत एकूण ५०० कोटी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी झाली आहे. त्यामध्ये बॉम्ब व सुतळी बॉम्बसह आकाशात उडणा-या रॉकेट फटाक्यांचा अधिक आनंद घेण्यात आला आहे.
फटाके विक्रेत्यांनी दिलेल्या महितीनुसार, मोठ्या आवाजातील फटाक्यांना मागणी वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आवाज करणा-या फटाक्यांना यंदा मागणी वाढली आहे. शिवाजी पार्क, मरिन ड्राईव्ह, बॅण्ड स्टॅण्ड इत्यादी ठिकाणी मुंबईकर फटाके फोडण्यासाठी गर्दी करत आहेत.
चिंताजनक एक्यूआयची नोंद
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विषारी रसायने असलेल्या फटाक्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. तरीही बंदी असलेल्या बेरियम रसायनाचा वापर करण्यात आलेल्या फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. इतकेच नाही; तर अनेक विभागांत सकाळी ४ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १ वाजेपर्यंत फटाके फोडले जात आहेत. परिणामी दिवाळीच्या दिवसांत लगेचच हवा प्रदूषणात वाढ झाल्यामुळे चिंताजनक एक्यूआयची नोंदही झाली आहे.