सोलापूर : प्रतिनिधी
दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा खून झाल्याचा गुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तब्बल ४७ लाख रुपयांच्या देवाणघेवाणीतून वाद होऊन त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल दत्तात्रय बनसोडे (३६, रा. सावित्रीबाई फुले हाउसिंग सोसायटी, संभाजीनगर नांदणी रोड, जयंिसगपूर, शिरोळ जि. कोल्हापूर) यास अटक करण्यात आली आहे. रमण साताप्पा साबळे (वय-३६, रा. लक्ष्मी पेठ, देगाव रोड, सोलापूर) झालेल्या तरुणाचे नाव आहे.
११ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मयत रमण साताप्पा साबळे हा डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई येथे जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. परंतु तो पुन्हा घरी परत आला नाही. यामुळे त्याची आई मीना साताप्पा साबळे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याबाबतची खबर दिली होती, त्यानुसार फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद (३६/२०२३) ने १८ एप्रिल २०२३ रोजी दाखल केली होती. पोलिस ठाण्यातील विशेष पथकाकडून त्याचा शोध सुरू झाला होता.
दरम्यान, मीना साबळे यांनी पोलिस आयुक्तांना समक्ष भेटून मुलाचा लवकरात लवकर शोध व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी उपायुक्त दीपाली काळे यांना आदेश दिले होते. शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सायबर पोलिस ठाण्यातील अंमलदार प्रकाश गायकवाड यांच्याशी चर्चा करून त्या तरुणाच्या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती, बँक व्यवहाराचे अभ्यास करून शोध सुरू केला. याच्या चौकशीची जबाबदारी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आली होती.
बेपत्ता झाल्यापासून त्याची सर्व माहिती प्राप्त करून घेण्यात आली. तो बँकेत नोकरीस होता. त्या बँकेतील मित्रांकडे आणि त्याच्या घरच्यांकडे सखोल चौकशी आणि तपास करण्यात आला. मात्र या दोन्ही ठिकाणच्या तपासामध्ये त्याची कोणासोबत देखील वाद नसल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या तांत्रिक माहितीवरून बँक व्यवहाराची सविस्तर माहिती प्राप्त केली असता त्याचे विशाल बनसोडे यांच्याशी संपर्क तसेच त्याच्या सोबत पैशाचा व्यवहार असल्याचे दिसून आले होते.
११ एप्रिल २०२३ रोजी रात्री सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्याजवळील राजुरी गावाकडे जाणा-या रस्त्याच्या बाजूला असलेल्या माळरानावर त्या दोघांमध्ये ४७ लाख रुपये देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता. त्या वादामध्ये विशाल दत्तात्रय बनसोडे यांनी रमण साबळे याचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर टोल नाक्याजवळील एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणि डिझेल आणून बॉडी कोणाची आहे? हे ओळखू येऊ नये म्हणून त्या बॉडीवर पेट्रोल आणि डिझेल टाकून पेटवून दिले होते, अशी कबुली आरोपीने पोलिस तपासात दिली आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठीतपासा दरम्यान सांगोला पोलिसांनी देखील त्याठिकाणी पडलेल्या जळीत बॉडीचा शोध लागला नसल्याचे आणि तपास सुरू असल्याचे सांगितल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना दिशा मिळाल्याचे सांगण्यात आले. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शहर पोलिस गुन्हे शाखेच्या सर्व पोलिसांनी प्रयत्न केले.