मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर दादरमधील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्रा आणि मुलगी तन्वी आहे.
प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. कोरोनामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. मात्र गेल्या ८ दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र आज सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. विक्रम गायकवाड यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील सरदार या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्यांनी मेकिंग ऑफ महात्मा, बालगंधर्व, संजू, ८३ या चित्रपटात आपल्या मेकअप कौशल्याने अनेक पात्र जिवंत केले होते. त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.