नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज म्हणजेच शुक्रवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक पुन्हा सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसलेले दिसले. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, आमदार नवाब मलिक यांना सत्ताधारी महायुतीत घेण्याबाबत खुली नाराजी व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. परंतु पत्र वाचल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी याप्रकरणी माध्यमांना इतर तपशील देण्यास मात्र नकार दिला. तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, नवाब मलिक यांच्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत. निवडणूक आयोगाकडे आमदारांची यादी दिली आहे, त्यातही आम्ही मलिक यांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत, असे ते म्हणाले.