अॅमस्टरडॅम : नेदरलँड्सच्या राजकारणासाठी ऐतिहासिक क्षण आला असून डच सेंट्रिस्ट पार्टी डी६६ चे ३८ वर्षीय नेते रॉब जेटन देशाचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान बनणार आहेत. २९ ऑक्टोबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. जेटन यांनी अँटी-इस्लाम पॉप्युलिस्ट गीर्ट वाइल्डर्स यांचा निवडणुकीत पराभव केला.
रॉब जेटन यांनी फक्त दोन वर्षांत आपल्या पक्षाला सर्वात खालून डच राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रसिद्ध घोषणा यस वी कॅनची प्रेरणा घेत हेट कॅन वी (म्हणजेच हे शक्य आहे) हा सकारात्मक नारा दिला. जेटन यांच्या नेतृत्वाखाली डी ६६ ने विभाजनाऐवजी एकतेचा, नकारात्मकतेऐवजी सकारात्मकतेचा संदेश देणारा प्रचार केला.
या विजयाबद्दल जेटन म्हणाले, आम्ही एक अत्यंत सकारात्मक प्रचार मोहीम चालवली, कारण गेल्या काही वर्षांपासून नेदरलँड्समध्ये पसरलेल्या नकारात्मकतेला आम्ही थांबवू इच्छित होतो. मी नेदरलँड्सला पुन्हा युरोपच्या केंद्रस्थानी आणू इच्छितो, कारण युरोपीय सहकार्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
















