29.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाटी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ जाहीर

टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ जाहीर

नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघटनेने १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये खेळल्या जाणा-या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. टी-२० विश्वचषक २०२४ साठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये किवी संघाने प्रथम आपला संघ जाहीर केला असून, अनुभवी खेळाडू केन विल्यमसनकडेच संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

न्यूझीलंड संघात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणा-या रचिन रवींद्रलाही संघात स्थान देण्यात आले आहे.न्यूझीलंड संघ टी-२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध ७ जून रोजी गुयानाच्या मैदानावर होणा-या सामन्याने करेल. टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाची कामगिरी आतापर्यंत चांगलीच राहिली आहे मात्र, त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघ चौथ्यांदा या मेगा स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. यापूर्वी, विल्यमसनच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर २०२१ च्या टी-२० विश्वचषकात संघाने अंतिम फेरी गाठली होती.

टी-२० विश्वचषक २०२४ साठी न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन अ‍ॅलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR