मुंबई : किरण मानेंनी सातारा येथील जरांगेंच्या सभेचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओखाली किरण माने लिहीतात, जरांगे पाटलांची राजधानी साता-यातली सभा राजासारखी झाली… देखणी… रूबाबदार. मी खेडेगांवात लहानाचा मोठा झालो आहे. राजकीय नेत्यांसाठी सभेला गर्दी जमवणे किती सहजशक्य असते, हे मी डोळ्यांनी पाहिले आहे.
कशा जीपा,ट्रक,टेम्पो भरून माणसे सभेला नेली जातात… कशा घोषणा दिल्या जातात. त्यानंतरच्या पार्ट्या, दारू सगळे माहित आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य माणसाच्या सभेला उत्स्फूर्तपणे, मनापासून, स्वत:हून घरातनं उठून सभेला जाऊन बसणारी माणसे बघायला मिळताहेत. भर उन्हात, रात्री दोन-दोन वाजेपर्यन्त त्याची वाट पहातात. हे कुठल्याही नेत्याला आजच्या काळात शक्य नाही.
किरण माने पुढे लिहीतात, मी सातारचं जरांगे पाटलांचं भाषण पूर्ण ऐकलं. जेवढ्या तळमळीनं लोक येतात, तेवढ्याच मनापासून, नितळ, स्पष्ट, परखड, सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस आहे. आरक्षणाविषयी सगळी कायदेशीर माहीती आहे. आरक्षणाचा लाभ घेर्णाया इतर वर्गांविषयी जराही कटुता त्यांच्या मनात नाही. द्वेषभावना न पसरवता, मनातून आपण सगळे जातीधर्माचे लोक एक आहोत असा सूर भाषणात असतो, जो आश्वासक आहे.