मुंबई : वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर खेळाडूंना मंचावर बोलावून सन्मानित करण्यात आले. दरम्यान टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये टूर्नामेंटचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या जसप्रीत बुमराहने निवृत्तीबाबत सर्वप्रकारच्या शक्यता फेटाळल्या असून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे बुमराहने स्पष्ट केले आहे.
टी-२० वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या तीन दिग्गज खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. त्यानंतर आता बुमराहही निवृत्तीबद्दल स्पष्ट बोलला असून बुमराह म्हणाला की, सध्या टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही, ही फक्त त्याची सुरुवात आहे. त्यांना अजून पुढे जायचे आहे.
फायनल जिंकल्यानंतर रडला बुमराह
जसप्रीत बुमराह म्हणतो की मी सहसा कधी रडत नाही पण हा विजय अविश्वसनीय होता. माझ्या मुलाला पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या भावना उमटल्या त्या खूपच आश्चर्यकारक होत्या. यानंतर मला माझे अश्रू आवरता आले नाहीत. टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. टीम इंडियाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा बुमराहने टीमला विकेट मिळवून दिली. या स्पर्धेत बुमराहने ४.१७ च्या इकॉनॉमीसह १५ विकेट घेतल्या. भारताला चॅम्पियन बनवण्यात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बुमराहला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.