25.9 C
Latur
Wednesday, June 25, 2025
Homeराष्ट्रीयआता पॅनकार्डसाठी आधारकार्ड अनिवार्य

आता पॅनकार्डसाठी आधारकार्ड अनिवार्य

१ जुलैपासून नवा नियम, करप्रणाली मजबूत करण्याच्या दृष्टीने उचलले पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
करदात्यांशी संबंधित नियमावलीत बदल करण्यात येत असून, आता १ जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहे. आता पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल. कर प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून या नवीन नियमानुसार तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करू शकणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, त्यांना तातडीने आधारकार्ड काढावे लागणार आहे.

करदात्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे करचोरी रोखली जाईल आणि करदात्यांची ओळख अधिक अचूक होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. म्हणून जर तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर आधी तुमचे आधार कार्ड बनवून घ्या, असे सांगण्यात आले. १ जुलैपासून हा नियम लागू होणार असल्याने आता ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, त्यांना आता आधारकार्ड काढून घ्यावे लागणार आहे.

सध्याच्या नियमानुसार, पॅन क्रमांकासाठी अर्ज करताना अर्जदाराला त्याचे नाव आणि जन्म दिनांकाचा पुरावा जोडून किंवा पर्यायी ओळख कागदपत्रे जोडून अर्ज करता येत होता. मात्र, एक जुलैपासून तसे करता येणार नाही. डिजिटलायझेशनची प्रक्रिया सध्या सुरू असल्यामुळे पॅनसाठी आधारवर आधारित पडताळणी प्रणाली राबवण्यात येत असल्याचे संबंधित अधिका-याने सांगितले.

एकाच व्यक्तीकडे अनेक पॅनकार्ड असण्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर पॅन आणि आधार एकमेकांशी संलग्न करणे अनिवार्य झाले. त्याचप्रमाणे जीएसटी नोंदणी करताना अनेक पॅन क्रमांकांच्या मदतीने नोंदणी करून जीएसटी चुकवण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. मार्च २०२४ पर्यंत देशातील पॅनकार्डधारकांची संख्या ७४ कोटी नोंदली गेलेली आहे. यापैकी ६०.५० कोटी नागरिकांनी पॅन-आधार जोडणी पूर्ण केली आहे.

पॅनकार्डचे डिजिटायझेशन होणार
प्राप्तिकर विभाग पॅन २.० ही मोहीम राबवण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहिमेअंतर्गत पॅनकार्डधारकांना पॅनकार्डे डिजिटल स्वरूपात दिली जाणार आहेत. पॅनकार्डांचेही डिजिटायझेशन होणार आहे. यामुळे करदात्यांना चांगली सेवा दिली जाईल, असा प्राप्तिकर विभागाचा दावा आहे. सध्या ज्यांच्याकडे पॅनकार्ड आहेत, ते तीच कार्ड वापरू शकतील. नवी मोहीम राबवली जाणार असली तरी जुनी कार्ड वैध राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR