29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रआता राज्यात बेमुदत उपोषण

आता राज्यात बेमुदत उपोषण

जालना : मनोज जरांगे पाटील आता राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले असून, त्यासाठी आता त्यांनी राज्यात ज्यांना शक्य आहे, त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण सुरू करावे आणि इतरांनी साखळी उपोषण करावे, असे आवाहन आज त्यांनी केले. दरम्यान, उपोषणादरम्यान कुणाला काही झाल्यास याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. त्यामुळे उद्यापासून मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. दिवसेंदिवस आरक्षणाचा वाद चिघळत चालल्याने राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

राज्य सरकारच्या मागणीनुसार मुदत देऊनही आरक्षणाबद्दल कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या अगोदरच जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा माघार नाही, असे म्हटले होते. त्यानुसार जरांगे पाटील आता आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी अन्न, पाणीच काय, उपचारही घेणार नाही, असा इशारा दिला होता. आता त्यांनी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले आहे.

आज त्यांनी ज्यांना-ज्यांना शक्य असेल त्यांनी आता उद्यापासून आमरण उपोषण सुरू करावे आणि इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावे, असे आवाहन करतानाच या आंदोलनादरम्यान जर कुणाला काही झाले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा दिला. या अगोदरच गावोगाव पुढा-यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांची आता कोंडी झाली आहे. कारण ठिकठिकाणी राजकीय पुढा-यांच्या गाड्या अडवून त्यांना घेराव घालून मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारला जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील बारामती तालुक्यातून परत जावे लागले. कारण त्यांना माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमासाठी जायचे होते. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांना रोखले. त्यामुळे खुद्द अजित पवारांनाच माघारी फिरावे लागले. यासोबतच नांदेड जिल्ह्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तसेच अन्य नेत्यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापुढे या आंदोलनाची धग पसरण्याची चिन्हे आहेत.

आमदारांनी मुंबईत जाऊन आवाज उठवावा
मनोज जरांगे म्हणाले की, गावागावांत आता पुढा-यांना बंदी करा. ते इकडे येऊन काय करणार आहेत. त्या आमदारांनी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणावर आवाज उठवावा. आमची मुले मरत असताना तुम्ही मजा बघू नका, जरा गांभीर्याने घ्या अन्यथा झेपणार नाही.

अर्धवट आरक्षण घेणार नाही
मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, ही भूमिका पुराव्यासाठी होती. आता जर पुरावे सापडले तर राज्यातील सर्वच मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल, असे अर्धवट आरक्षण घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. बाकीच्या जातींना दिलेले आरक्षण अर्धवट असेल तर मग आम्हीही घेऊ, असा शहाणपणा आम्हाला शिकवू नका, असे ते म्हणाले.

बीडमध्ये महामार्ग रोखला, बस जाळली
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा आता राज्यभर पेटत असून बीडमध्ये आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला. या ठिकाणी आंदोलकांनी टायर पेटवून घोषणाबाजी केली. रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, संतप्त कार्यकर्त्याने बस पटवली आणि तेथून तो पळून गेल्याचे समजते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला असून बीड शहरापासून जवळच असलेल्या बायपास रोडवर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल आहे. महालक्ष्मी चौकात अचानक मराठा आंदोलक एकत्र आले आणि त्यांनी रास्ता रोको सुरू केला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तसेच धुळे सोलापूरसह बीड शहरात जाणारी वाहतूकही ठप्प झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR