22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रआता लाडक्या भावाच्या खात्यातही पैसे जमा होणार

आता लाडक्या भावाच्या खात्यातही पैसे जमा होणार

१० सप्टेंबरपर्यंत जमा होणार रक्कम

मुंबई : प्रतिनिधी
महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात १ लाख १० हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ६० हजारांहून अधिक युवा खाजगी आणि शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून ८ हजार १७० आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवकांना १० सप्टेंबरपर्यंत डीबीटीद्वारे विद्यावेतन त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर जमा होईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली. त्यामुळे आता लाडक्या भावांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होतील, असे ते म्हणाले.

भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी ८ हजार १७० आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच २ लाख २१ हजार २४४ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे.

धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक युवा रुजू
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालोखाल अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार युवा रुजू झाले आहेत.

१० लाख युवकांना प्रशिक्षण
या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरू राहणार असून यातून १० लाख युवकांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR