पंढरपूर : माघ यात्रा एकादशीच्या पार्श्वभूमीवर संतांच्या दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. भक्तीसागर ६५ एकर, पंढरीनगरी भाविकांनी गजबजली आहे. त्याचबरोबर माघी यात्रेनिमित्त प्रासादिक साहित्यांची दुकानेदेखील फुलली आहेत. पेढे, बुक्का, जपमाळा, देवदेवतांच्या मूर्ती, फोटो फे्रम आदी खरेदीसाठी भाविक पसंती देत आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात प्रासादिक साहित्यांची दुकाने फुलल्याचे दिसून येते.
विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांकडून प्रासादिक साहित्य, फोटोफ्रेम, मूर्ती, जपमाळा, त्याचबरोबर जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यास भाविक प्राधान्य देत आहेत. भाविक व नागरिकांची मागणी लक्षात घेता व्यापारी व दुकानदार यांच्याकडून दखल घेत सेवा पुरवली जात आहे. यामुळे देखील भाविक बाजारपेठ बहरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरपुरातील मंदिर परिसरात त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग, ६५ एकर, दर्शन रांग, गोपाळपूर रोड, रेल्वे स्थानक परिसर, वाखरी रोड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी विक्रेते आपले स्टॉल लावून साहित्यांची विक्री करत आहेत. विठ्ठलास प्रिय असणारी तुळशी माळ तुळशीच्या लाकडापासून १०८ मण्यांची बनवलेली असते. तुळशीच्या माळेचे वेगवेगळे प्रकार आहेत. माळेची किंमत २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे. भाविकांकडून विशेषत: महिला भाविकांकडून माळेची मागणी होत असल्याचे तुळशी माळ विक्रेते महेश उपळकर यांनी सांगितले.