नागपूर : विशेष प्रतिनिधी
कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आणि उत्साह काटोल विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार सलील देशमुख यांना भोवला. झाले असे कि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे अवघ्या १ मिनिटांचा उशीर झाल्यामुळे सलील देशमुखांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.
आता ते उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र २०१९ मध्ये जी कहाणी अनिल देशमुख यांच्या सोबत घडली तीच घटना आज त्यांच्या पुत्राच्या बाबतीत घडल्याने जुनी आठवण नव्याने ताजी झाली.
२०१९ मध्ये अनिल देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाच्या आदल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन मिनिटांचा उशीर झाला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी दुस-या दिवशी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सलील देशमुख यांच्या संदर्भातही तसेच घडले आहे.
उद्या पुन्हा आई-वडील आणि मित्र पक्षांच्या नेत्यांसह येऊन उमेदवारी अर्ज दाखल करेल. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना एक मिनिटाचा उशीर झाला. बाईकवर येऊन वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र एक मिनिट उशीर झाल्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करू शकलो नाही. आमच्या वकिलांनी सर्व काळजी घेतली आहे. त्यामुळे काटोल मतदारसंघातून तुतारी वाजवणारा माणूस म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार राहील याची खात्री आहे. असा विश्वास सलील देशमुख यांनी यावेळी बोलून दाखवला.