35 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री फेलोशिप योजनेद्वारे तरुणांना प्रशासनात काम करण्याची संधी

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेद्वारे तरुणांना प्रशासनात काम करण्याची संधी

१ वर्षासाठी मानधनावर होणार नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर करण्यात आला असून त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणा-या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्या नंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत केली जाईल. फेलोंच्या निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत. अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) असावा. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक २० जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील. फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा एकत्रित मानधन ६१,५०० रूपये छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR