मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. यासाठी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलनही करण्यात आले. विधिमंडळाच्या पाय-यांवर करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, तुमच्या गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, सातत्याने जालन्याला ज्या अमानुष पद्धतीने महिलांवर, मुलांवर अन्याय आणि लाठीचार्ज केला जात आहे. याच गृहमंत्रालयाने त्यानंतर ज्या पद्धतीनं कोयता गँग असेल आणि ज्या पद्धतीने मराठा असेल, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण त्याच्यात गृहमंत्रालयाचं जास्त आहे, त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे.
कालपासून हेच बोलत आहेत की, काल सत्तेत असलेले जे आमदार आहेत. मंत्र्यांची कॅबिनेट झाली होती, सह्याद्रीला आणि आंदोलन सत्तेत असलेले आमदार करत होते, गव्हर्नर हाऊसला. गव्हर्नर हाऊस आणि सह्याद्रीमध्ये तुम्ही चालत जरी गेला तरी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार गव्हर्नर हाऊसला सत्तेत जातात. याचाच अर्थ आम्ही तर विरोधातच आहोत, पण सत्तेत असलेल्याही आमदारांना या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.