नवी दिल्ली : संसदेची कडेकोट सुरक्षा भंग करून बुधवारी संसदेत घुसखोरी करण्यात आली होती. आता या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या ललित झा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ललित झा याने आपल्या एका साथीदारासह आत्मसमर्पण केले आहे. दोघेही गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील ड्युटी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि विशेष कक्षाच्या ताब्यात दिले.
या प्रकरणाचा तपास स्पेशल सेल करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारीच पाच जणांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर ललित झा राजस्थानमधील नागौरला बसने गेले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. तेथे त्यांनी एका हॉटेलमध्ये रात्र काढली. गोंधळाच्या वेळी ललित झा संसदेच्या बाहेर उपस्थित होता, असे सांगण्यात येत आहे.
ललित संसदेत घडलेल्या घटनेनंतर राजस्थानला गेला. राजस्थानला गेल्यानंतर तिथे आपल्या सहकाऱ्यांना भेटला आणि हॉटेलमध्ये राहिला. त्यानंतर पोलीस शोधत असल्याचे त्याला कळाले त्यानंतर ललित बसने दिल्लीला आला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
देशाच्या संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य अशी चूक घडली आणि काही जणांनी सभागृहात घुसखोरी केली. मात्र हा प्लान दीड ते दोन वर्षापूर्वी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संसदेत घुसखोरी करण्याचे प्लॅनिंग जवळपास दीड-दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सगळ्यांची पहिली एकत्रित बैठक मनोरंजनच्या कर्नाटकातील मैसूरमधील घराजवळ झाली होती.