नवी दिल्ली : नीट पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांच्या पेलेट गन चालवण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्यावर देशभरातील वातावरण तापले आहे. तसेच विरोधी पक्ष आक्रमक असून ते या मुद्यावर सरकारला जाब विचारत आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी मोठे विधान केले आहे. आपण याची जबाबदारी स्वीकारत आहोत असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी पेलेट गन चालवण्याच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारली आहे. पेलेट गनच्या वापरावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सिंग म्हणाले, मी त्याची जबाबदारी घेत आहे. कर्तव्यावर असताना सैनिकांनी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सीआरपीएफच्या पदग्रहण समारंभात बोलताना, ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सैनिकांना आश्वासन दिले की, ते ऑपरेशनल बटालियनमध्ये तैनात असोत किंवा कायदा आणि सुव्यवस्था युनिटमध्ये, राष्ट्रीय हित, जनहित आणि दलाच्या हितासाठी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी ते घेतील. त्यांनी सैनिकांना निर्भयपणे आपले काम सुरू ठेवण्याचे आवाहन केले. जिथे गरज असेल, तिथे सीआरपीएफचे महासंचालक म्हणून ते जबाबदारी स्वीकारतील, असे त्यांनी सांगितले.
तर शिस्तभंगाची कारवाई
पूर्वीच्या एका अहवालानुसार, सीआरपीएफ मुख्यालयाने आपल्या सर्व क्षेत्रीय युनिट्सना एक संदेश पाठवून अलीकडील तैनातीदरम्यान सैनिकांनी दाखवलेल्या संयम आणि धैर्याची प्रशंसा केली होती. सीआरपीएफने हे देखील स्पष्ट केले की, कोणत्याही स्तरावर हेतुपुरस्सर निष्काळजीपणा किंवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास, नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
















